मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख करून नंतर अनेक आमिष देत अनेक तरुणीचे अपहरणसह अत्याचाराच्या घटना वाढत असतांना एक धक्कादायक प्रकरण मुंबईमधून समोर आले आहे. इन्स्टाग्रामवर तरुणींची ओळख करून त्यानंतर त्यांचं लैंगिक आणि आर्थिक शोषण करणारा डॉक्टरला पोलिसांना गजाआड झाला आहे. योगेश भानुशाली असे या आरोपीचे नाव असून त्याला मुंबईच्या मालवणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
त्याच्याविरोधात आतापर्यंत ३ तरुणींनी बलात्कार आणि फसवुकीच्या तक्रारी दिल्या आहेत. आणखी मुली त्याच्या जाळ्यात फसल्या असण्याची शक्यता असून पोलीस शोध घेत आहे. नालासोपारा येथील तुळींज पोलिसांनी हे प्रकरण सर्वप्रथम उघडकीस आणले होते. नालासोपारा येथे राहणार्या २१ वर्षीय तरुणीची इन्स्टाग्रामवर डॉ. योगेश भानूशाली (३१) याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचे मैत्रीत रुपांतर झाल्यानंतर त्याने तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. यानंतर वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिच्याकडून पैसे उकळू लागला. मात्र तरुणीने लग्नाची विचारणा केली तेव्हा नकार दिला.
घडलेल्या प्रकारामुळे तरुणी डिप्रेशनमध्ये गेली होती. अखेर तिच्या आईने नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती. मात्र ती तक्रार देण्यास तयार नव्हती. तिने हातावर देखील आरोपी योगेशच्या नावाचं टॅटू काढलं होतं. अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर पाटील यांनी मुलीचे समुपदेशन करून तिला तक्रार देण्यास मन वळवले. पोलिसांवर विश्वास बसल्यानंतर तरुणीने तक्रार दाखल केली. तिच्यावर मालाडमधील योगेश भानुशालीच्या घरी अत्याचार झाल्याने गुन्हा मालवणी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी भानूशालीवर गुन्हा दाखल करून अटक केली.
यानंतर वापी (गुजरात) येथे राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणीने तसेच मुंबईत राहणार्या आणि कॉल सेंटरमध्ये काम करणार्या २३ वर्षीय तरुणीने या डॉक्टर विरोधात तशाच तक्रारी दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर ओळख करून प्रेमाच्या जाळ्यात ओढून तो या तरुणींशी संबंध प्रस्थापित करायचा. तसेच त्यांच्याकडून पैसेही उकळत होता. या प्रकरणात आणखी ६ ते ७ तरुणी पीडित असल्याची शक्यता पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी व्यक्त केली आहे. आरोपी भानुशाली याच्याविरोधात २०२० मध्ये देखील अत्याचार आणि पोक्सोअंतर्गत गुन्हे दाखल आहेत.