पुणे : वृत्तसंस्था
सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक तरुण तरुणीची फसवणुकीच्या घटना नियमित झाली आहे तर सध्या नोकरी देऊन जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची साडेसात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. तरुणाला टेलिग्रामवर वेगवेगळे टास्क देऊन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार ऑगस्ट 2023 मध्ये ऑनलाईन पद्धतीने तरुणाच्या कात्रज येथील घरी घडला आहे.
याबाबत अभिजीत महादेव नवघणे (वय-30 रा. कात्रज) याने पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सायबर पोलिसांनी हा गुन्हा भारती विद्यीपीठ पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. त्यानुसार 94743XXXXX मोबाईल धारक, टेलिग्राम धारक, कस्टमर सर्व्हिसचे राधिका आणि नवनीत कामत यांच्यावर आयपीसी 419, 420, 34 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादी नवघणे यांना संपर्क करुन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना नोकरी देऊन जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवले. त्यांना लिंक देऊन टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी करुन घेतले. त्यानंतर त्यांना जास्त कमाईचे आमिष दाखवून टेलिग्रामवर वेगवेगळे टास्क दिले.
त्यानुसार नवघणे यांनी टास्क पूर्ण केले. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादी यांना 7 लाख 46 हजार 382 रुपये विविध बँक खात्यावर जमा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी अभिजीत नवघणे यांनी ऑनलाईन पैसे जमा केले. मात्र, त्यानंतर सायबर चोरट्यांनी कोणताही टास्क न देता तसेच पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवघणे यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे विजय पुराणीक करीत आहेत.