अहमदाबाद ; वृत्तसंस्था
वेश्या व्यवसायाविरुद्धच्या राज्यव्यापी धडक मोहिमेचा भाग म्हणून गुजरात पोलिसांनी ८०५ स्पा, मसाज पार्लर व हॉटेल्सवर छापे टाकून १०० हून अधिक लोकांना अटक केली आहे, असे राज्य सरकारने शुक्रवारी सांगितले. गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी कायदेशीर व्यवसायाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा संशय असलेल्या सर्व ठिकाणांवर छापे टाकण्याचे निर्देश दिल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी ही मोहीम राबवली.
पोलिसांनी गुरुवारी राज्यभरात ८५१ ठिकाणी छापे टाकले आणि बेकायदा कृत्यांत गुंतलेल्या १०५ जणांना अटक केली. तसेच १०३ एफआयआर (प्रथम माहिती अहवाल) नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांनी २७ स्पा सेंटर्स आणि हॉटेल्सचे परवाने रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे.