अकोला : वृत्तसंस्था
महसूल त्यानंतर आता पोलीस विभागात देखील अनेक महिन्यापासून लाच घेण्याचे प्रमाण वाढले असतांना दिसून येत आहे. अशीच एक घटना अकोला तालुक्यातील बळापूर पोलीस ठाण्यात घडली आहे. पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तीन हजार रुपये लाच स्वीकारताना अकोला तालुक्यातील बळापूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. सुभाष शालीकराम दंदी (वय-56 रा. गीतानगर, राहतनगर जवळ, अकोला) असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे. एसीबीने ही कारवाई शुक्रवारी (दि.20) वाडेगाव पोलीस चौकीत सापळा रचून केली.
याबाबत वाडेगाव येथील 28 वर्षाच्या तरुणाने अकोला एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्यावर बाळापूर पोलीस ठाण्यात आयपीसी 504,506 अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तकारदार यांच्यावर कोणतीही प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदार सुभाष दंदी यांनी चार हजार रुपये लाच मागितली. तडजोडी अंती तीन हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी याबाबत अकोला एसबीकडे तक्रार केली.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता पोलीस हवालदार सुभाष दंदी यांनी तक्रारदार यांच्याकडे चार हजार रुपये लाचेची मागणी करुन तीन हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार शुक्रवारी वाडेगाव पोलीस चौकीत सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारताना दंदे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर बळापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मारूती जगताप, अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक शिवलाल भगत, पोलीस उपअधीक्षक मिलिंद कुमार बहाकार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे पोलीस अंमलदार चित्रा वानखडे, निलेश महींगे, संजय कोल्हे, आशिष जांभोळे, बारबुद्धे, स्वप्नील क्षीरसागर यांच्या पथकाने केली.