नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील काही राज्यातील विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे त्यामुळे अनेक राज्यात राजकारण रंगू लागले आहे पण छत्तीसगडमधील बिजापूर शहरातील सारखेडा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. कामासाठी दुचाकीवरून बाहेरगावी निघालेल्या भाजप नेत्याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बिरजू ताराम असं हत्या झालेल्या भाजप नेत्याचं नाव आहे. नक्षलवाद्यांनी ही हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
छत्तीगडमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी नोव्हेंबर महिन्यात मतदान होणार आहे. मात्र, या निवडणुकीवर बहिस्कार टाका, अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकी परिसरातील नागरिकांना दहशतवाद्यांकडून देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी ही हत्या केल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिरजू ताराम शुक्रवारी संध्याकाळी घरी जेवण करून दुर्गा पंडालला जाण्यासाठी बाईकवरून घरातून निघाले होते. औंधी पोलीस ठाण्यापासून ४ किमी अंतरावर असलेल्या अंबागड चौकी परिसरातील सारखेडा गावात दहशतवाद्यांनी त्यांना अडवले.
दहशतवाद्यांनी बिरजू यांना मारहाण करत त्यांच्यावर गोळी झाडली. या घटनेत बिरजू यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बिरजू यांचा मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, बिजापूर येथे नक्षलवाद्यांची दहशत काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी बिजापूर येथील एका भाजप नेत्याची हत्या केली होती. अशीच घटना पुन्हा शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडल्याने परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.