नागपूर : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक ठिकाणी पोलीस कारवाई करून बेकायदेशीर सुरु असलेले धंदे बंद करीत आहे. अशीच एक कारवाई नागपूरात देखील करण्यात आली आहे. सलूनच्या नावाआड काहीजण नको ते धंदे करत असल्याचे उघड झाले आहे. तेथे सुरू असलेल्या देह व्यापाऱ्याचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला. या देहव्यापार प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. तसेच धाड टाकून एका अल्पवयीन मुलीची सुटका देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
वर्धा रोडवरील एका सलूनमध्ये बराच काळ हा गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. दीपक मदन कटवते ( रा सिव्हील लाईन) आणि प्रवीण रामभाऊ ( रा. बोरगाव रोड) कान्होलकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपींचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे १७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ही धाड घालण्यात आली. शहरातील वर्धा रोडवरील स्वामी विवेकानंद चौकात, ॲक्सिस बँकेच्या बाजूला हेअर डीवाईन हे युनिसेक्स सलून आहे. तेथे सलूनच्या नावाखाली देहव्यापार चालतो, अशी माहिती खबऱ्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट एकला दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचत डमी ग्राहक पाठवून तेथे चाचपणी केली. तेथून कन्फर्मेशन येताच पोलिस अधिकाऱ्यांनी सलूनवर धाड टाकली.
तेथे पोलिसांनी दीपक मदन कटवते ( रा सिव्हील लाईन) आणि प्रवीण रामभाऊ ( रा. बोरगाव रोड) या दोन आरोपींना अटक केली. तेथे एक १७ वर्षांची अल्पवयीन मुलगी देखील होती. दोघेही आरोपी गरीब घरातील मुलींना पैशांचं आमिष दाखवून त्यांना देहव्यापारात ढकलत होते, तसेच देह व्यापारासाठी जागा उपलब्ध करून द्यायचे अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. सलूनवर धाड टाकल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकत अटक केली. याप्रकरणी त्यांची पुढील चौकशी सुरू आहे. तर त्या पीडित अल्पवयीन मुलीला महिला बालसुधारगृहात पाठवले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वीही नागपूरमधून स्पाच्या आडून सुरू असलेल्या देह व्यापाराचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला होता. सदर हा परिसर येथे स्पाच्या आडून देह व्यापाराचा सर्रास धंदा सुरू होता. वेगवेगळ्या राज्यातील युवती आणि महिलांना आमिष दाखवून या ठिकाणी आणलं जायचं आणि त्यांच्याकडून देह व्यापार करून घेतला जायचा. पोलिसांनी तेथे धाड टाकून कारवाई केली होती.