चोपडा : प्रतिनिधी
चोपडा ते शिरपूर सीमेवरील अनेर डॅमकडून पुढे तालुक्यातील गणपूर ते मराठे रस्त्यावर एका दुचाकीवर ७ किलो गांजा नेला जात असल्याची गुप्तवार्ता चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी एका दुचाकीचालकाला मराठे ते गणपूर रस्त्यावरील त्रिफुलीवरुन पाठलाग करत ताब्यात घेतले. ७ किलो गांजा पोलिसांनी जप्त करुन चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील भगवानपुरा तालुक्यातील शिरवेल महादेव येथील मूळ रहिवासी व हल्ली कुंड्यापाणी येथे राहणारा कैलास अमरसिंग बारेला (वय ४६ ) हा सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अनेर डॅम परिसरातून मराठे ते गणपूर रस्त्यावरुन दुचाकी (एमएच – १९, बीए – ६४५५) वरून ७ किलो गांजा घेऊन जात होता.
या वेळी चोपडा ग्रामीण पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले आहे. या कारवाईत ४३ हजार ८६० रुपयांचा ७ किलो ३०० ग्रॅम गांजा आणि ३० हजारांची दुचाकी असा एकूण ७३ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई पो. नि. कावेरी कमलाकर, एपीआय शेषराव नितनवरे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद पवार, शशिकांत पारधी, किशोर माळी व होमगार्ड यांनी केली. याप्रकरणी विनोद पवार यांच्या फिर्यादीवरून कैलास बारेलाविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय शेषराव नितनवरे करत आहेत.