जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तब्बल ८ गुन्हे दाखल असलेल्या टोळीने गुन्हे करणारा आशुतोष ऊर्फ आशू सुरेश मोरे (२१, रा. एकनाथनगर, रामेश्वर कॉलनी) व दीक्षांत ऊर्फ दादू देवीदास सपकाळे (१९, रा. मेहरुण) या दोन जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. तसे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी १७ ऑक्टोबर रोजी दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आशुतोष देवरे व दीक्षांत सपकाळे या दोघांविरुद्ध एमआयडीसी व शनिपेठ पोलिस ठाण्यात दरोड्याचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक हत्यार बाळगणे असे वेगवेगळ्या प्रकारचे आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोघांच्या हद्दपारीचा प्रस्ताव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, सहायक फौजदार अतुल वंजारी पोलिस नाईक सचिन पाटील, योगेश बारी, इमरान सय्यद, साईनाथ मुंडे, जमील शेख, इम्तियाज खान यांनी पोलिस अधीक्षकांकडे पाठविला होता. डीवाय.एस.पी. संदीप गावित यांनी या प्रस्तावाची चौकशी केली. चौकशीअंती दोघांना दोन वर्षांकरिता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले. या हद्दपार प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, सहायक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनील दामोदरे यांनी पाहिले.