पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे शहर गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीच्या सावट खाली येत असतांना पुन्हा एकदा महिलेचे नाव आणि फोटो वापरून बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार केले. यानंतर महिलेला फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूक व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सेनापती बापट रोड येथे राहणाऱ्या 35 वर्षाच्या महिलेने सोमवारी (दि.16) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी बनावट अकाउंट तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात आयपीसी 420, 419, 384 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवार ते सोमवार दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वत: ची ओळख लवपून फिर्य़ादी यांचे नाव व फोटो वापरून इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार केले. त्यानंतर फिर्यादी यांना त्यांचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्याकडे दहा हजार रुपये खंडणी मागितली. आपल्या नावाने फेक अकाउंट तयार केल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे अंकुश चिंतामण करीत आहेत.