मुंबई : वृत्तसंस्था
एमपीएससीची उपनिरीक्षक पदासाठीची, नगरपरिषद भरती आणि ‘महाज्योती’तर्फे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रशिक्षणासाठी घेतली जाणारी परीक्षा या तीनही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी संभ्रमात आहे. विद्यार्थ्यांच्या या संभ्रमाची दखल घेत राज्य लोकसेवा आयोगाने आपल्या अखत्यारितल्या परीक्षांची तारीख बदलावी, अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली आहे. तसंच या प्रश्नी आपण विद्यार्थ्यांसोबत असल्याचा दिलासाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
२९ ऑक्टोबर रोजी राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC ची उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा आहे. याच दिवशी नगर परिषद भरती परीक्षाही आयोजित करण्यात आली आहे. तसंच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे घेतली जाणारी प्रवेश परीक्षाही याच दिवशी होणार आहे. राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण-तरुणी एकाच वेळी विविध परीक्षांसाठी अर्ज करत असतात. मात्र या तीनही परीक्षा एकाच दिवशी आल्याने एकाच वेळी या तीन परीक्षा कशा देणार, हा प्रश्न या विद्यार्थ्यांना भेडसावत आहे.
MPSC-UPSC परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत करून अभ्यास करत असतात. अशा वेळी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या परीक्षा ठेवल्याने या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. विद्यार्थ्यांना तीनपैकी एकच परीक्षा द्यायची संधी मिळेल. त्यामुळे उमेदवारांमध्ये धास्तीचं वातावरण आहे. राज्य व केंद्रीय स्पर्धा परीक्षा आयोगाने याची दखल घेत यापैकी दोन परीक्षांच्या तारखा तरी बदलाव्या, अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली आहे.
… तर बेरोजगारांची संख्या वाढेल
राज्यभरात पेपरफुटीचा मोठा घोळ सुरू असतानाच एकीकडे तिन्ही परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जात असतील. तर हा परीक्षार्थींचा मोठा अपमान आहे. उमेदवारांनी परीक्षेची तयारी कशी करावी? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडत आहे. सध्या देशात बेरोजगारांची संख्या वाढत आहे. जर अशा पद्धतीने परीक्षांमध्ये घोळ सुरू राहिले, तर नवीन बेरोजगारांची वाढ होऊ शकते. याकडे शासनाने काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. तसेच तरुणांचे भवितव्य उज्ज्वल बनविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. – आ. सत्यजीत तांबे.