मुंबई : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक तरुण तरुणी लग्न करण्यासाठी सोशल मिडीयावरील अनेक वेबसाईटचा उपयोग करीत असतात. त्यातील एक नावाजलेली वेबसाईट म्हणजे ‘शादी डॉट कॉम’ याच वेबसाईटच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून सोन्याचे दागिने घेऊन तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक केली. या प्रकरणी एका तरुणावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
लखन महादेव भिसे (रा. इंदापुर रोड, पिंपळी, ता. बारामती) याच्यावर आयपीसी 376/2, 377, 420, 406, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत टिळक रोड येथे राहणाऱ्या 25 वर्षाच्या तरुणीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जुलै 2022 ते मार्च 2023 या कालावधीत पुण्यात घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांची शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर ओळख झाली. आरोपीने त्याचा खोटा बायोडाटा पाठवून तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला लग्नाचे खोटे आमिष दाखवले. तिला पुण्यातील एका लॉजवर नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने वेगवेगळी कारणे सांगून तरुणीकडून रोख स्वरुपात पैसे व सोन्याचे दागिने घेऊन 8 लाख 3 हजार 738 रुपयांची फसवणूक केली. त्यानंतर फिर्यादी तरुणीने आरोपीकडे लग्न करण्याची मागणी केली असता तो टाळाटाळ करू लागला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात संबंधित तरुणीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. खडक पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खडक पोलीस करत आहेत.