जळगाव : प्रतिनिधी
रिक्षातून प्रवास करणाऱ्या वृद्धाकडील रोकड लांबविणाऱ्या ईस्माईल शेख शब्बीर (वय ४८, रा. मास्टर कॉलनी) सैय्यद आरीफ सैय्यद सईद (वय ३९, रा. पिंप्राळा हुडको) या दोघ चोरट्यांना शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्यांच्या मुसक्या आवळल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील लाहसर येथे राहणारे राजाराम तुळशीराम पाटील (वय ८८ ) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. शुक्रवारी ६ ऑक्टोबर रोजी ते कामाच्या निमित्ताने जामनेर शहरात आले होते. दुपारी ४ वाजेच्या सुमारास जामनेर पोलीस स्टेशन जामनेर बसस्थानक दरम्यान रिक्षातून प्रवास करत असतांना रिक्षातील काही चोरटयांनी त्यांच्याजवळील ५४ हजारांची रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्हा उघडकीस आणला असून दोन संशयित आरोपी हे जळगावातील असलेल्याचे समोर आले.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पथक तयार करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने शनिवारी सापळा रचून ईस्माईल शेख शब्बीर याला मास्टर कॉलनीतून तर सैय्यद आरीफ सैय्यद सईद याला पिंप्राळा हुडको परिसरातून अटक केली. त्या दोघांनी आपणच चोरी केल्या कबुली दिली. पुढील कारवाईसाठी दोघांना जामनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, पोहेकॉ अकरम शेख, पोहेकॉ सुधाकर आंभोरे, महेश महाजन, किरण चौधरी, पो.ना. विजय पाटील, पो.कॉ. सचिन महाजन यांच्या पथकाने केली आहे.