नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारीच्या घटना नियमित घडत आहे. अनेक निष्पाप नागरिकांना धमकावत, त्यांना ब्लॅकमेल करत त्यांची मेहनतीची कमाई लुबाडणाऱ्या खंडणीखोरांची दहशत सध्या चांगलीच वाढली आहे. यामुळे सामान्य नागरिक अतिशय त्रस्त झाले असून या खंडणीखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पोलिसांकडे करण्यात येत आहे.
खंडणीचं असंच एक प्रकरण समोर आलं आहे. सेवाभावी दवाखाना चालवत सर्वसामान्य नागरिकांची, रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरला खंडणीखोरांचा चांगलाच फटका बसला आहे. त्या डॉक्टरला ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून पाच लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली. याप्रकरणी सहा जणांच्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक शहरातील पानबाई सॅनिटोरियम येथे डॉ. मेरेविन सुसेराज लिओ हे सेवाभावी दवाखाना चालवतात. गेल्या अनेक वर्षांपासून या दवाखान्याच्या माध्यमातून त्यांनी रुग्णसेवेचे व्रत स्वीकारले आहे. मात्र त्यांना नुकताच खंडणीखोरांनी दणका देत त्यांच्या मेहनतीचे लाखो रुपये उकळले. या प्रकरणी सहा जणांच्या टोळीविरुद्ध देवळाली कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सहा आरोपींपैकी एकाच्या बहिणीला कामावर ठेवण्यास डॉ. लिओ यांनी नकार दिला होता.
याच रागातून त्या महिलेचा भाऊ आणि त्याच्या इतर साथीदारांनी डॉक्टरांना धमकावले आणि मारहाण केली. तसेच डॉक्टरांना ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. हा विषय बंद करायचा असेल तर त्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी द्या अशी मागणीही आरोपींनी केली. घाबरलेल्या डॉ. लिओ यांनी संशयितांना पाच लाख रुपये दिले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत उरलेले पाच लाख रुपये आणून द्या, असे आरोपींनी सांगितले. धास्तावलेल्या डॉ. लिओ यांनी अखेर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी डॉक्टरांच्या फिर्यादीवरून खंडणी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.