काबुल (वृत्तसंस्था ) : अफगाणिस्तानमधील परिस्थिती वेगाने चिघळत असून देश अनागोंदीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. आता तालिबान्यांनी देशातील दुसरे मोठे आणि महत्वाचे शहर असलेल्या कंदहारवर कब्जा मिळवल्याचं स्पष्ट झाले आहे. आता ज्या वेगाने तालिबानी दहशतवादी एक-एक प्रदेशावर कब्जा मिळवत आहेत ते पाहता त्यांच्यासाठी आता राजधानी काबुल दूर नाही, अशी काहीशी परिस्थिती आहे.
तालिबान्यांनी कंदहारवर कब्जा मिळवल्यानंतर आता ते काबुलकडे कूच करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अमेरिकेने आपल्या नागरिकांना अफगाणिस्तान सोडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच तालिबान्यांनी अमेरिकन दूतावासाला लक्ष्य करु नये, असेही सांगितले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून आपलं सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या या निर्णयामुळे जगाला वाटत असलेली चिंता आता खरी होताना दिसत आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानने पुन्हा एकदा डोके वर काढले असून त्यांनी मोठ्या भूभागावर वर्चस्व मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे.