नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक अल्पवयीन मुलीसह महिलांना टार्गेट केले जात असतांना एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बरेली शहरात उघडकीस आली आहे. मंगळवारी सायंकाळी सीबीगंज पोलीस स्टेशन परिसरात छेडछाडीला विरोध करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला, एका तरुणाने चालत्या ट्रेनसमोर फेकले. या घटनेत तिचा एक हात आणि दोन्ही पाय कापले गेले. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी कठोर भूमिका घेतली असून त्यांच्या आदेशानुसार सीबीगंज पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक कुमार कंबोज, प्रकाश प्रभारी उपनिरीक्षक नितीश कुमार शर्मा आणि एक हवालदार (राखीव) आकाशदीप यांना निष्काळजीपणासाठी निलंबित करण्यात आले आहे.
एसएसपींनी राधेश्याम यांची सीबीगंजचे नवीन निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. पदभार स्वीकारल्यानंतर सीबीगंज पोलिस स्टेशनचे नवीन निरीक्षक राधेश्याम यांनी सांगितले की, या घटनेतील मुख्य आरोपी विजय मौर्य आणि त्याचे वडील कृष्णा पाल यांना विविध कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे. दोघांवर कारवाई सुरू आहे. जखमी विद्यार्थिनीला तातडीने 5 लाख रुपयांची मदत देण्याचे आणि तिच्या उपचारात हलगर्जीपणा न करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.