कोल्हापूर : वृत्तसंस्था
कोल्हापूर शहरातील स्टेशन रोडवर थांबलेल्या देहविक्रय करणाऱ्या महिलेला (३२) दोघांनी जबरदस्तीने कारमध्ये बसवून आणि तोंडाला रुमाल लावून अपहरण केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडली. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी पाठलाग करून कार अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी धावत्या कारमधून उडी मारून महिलेने स्वतःची सुटका करून घेतली, तर पोलिसांच्या दुचाकीला धडक देऊन संशयित पळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, स्टेशन रोडवरील एका बेकरीसमोर संबंधित महिला उभी होती. त्यावेळी कारमधून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी तोंडाला रुमाल लावून तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. त्यानंतर कार स्टेशन रोडवरून भवानी मंडपकडे गेली. तिथून पुन्हा कार छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. यावेळी महिलेने वाचवा….. वाचवा… असा आरडाओरडा केल्याने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल अभिजित चव्हाण यांनी एका होमगार्डसह दुचाकीवरून कारचा पाठलाग सुरु केला.