नागपूर : वृत्तसंस्था
इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका तरुणाने अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण करीत तिचा विनयभंग केला. तू माझ्याशी लग्न केले नाही, तर तुझा जीवच घेतो, असे म्हणत त्याने मुलीचा विनयभंग केला. नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका १७ वर्षीय विद्यार्थिनीची राजिक खान ऊर्फ रियाज खान (२२, नवीन कामठी) याच्याशी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. काही काळाने ते फोनवर बोलू लागले व त्यांच्यात प्रेम झाले. मात्र, त्याची संगत चांगली नसल्याचे कळल्यावर विद्यार्थिनीने त्याच्याशी बोलणे बंद केले. त्यानंतर राजिक तिचा वारंवार पाठलाग करू लागला. त्याने तिला लग्नाचीदेखील मागणी घातली. मात्र, तिने त्याला नकार दिला. संतापलेल्या राजिकने ८ ऑक्टोबरला रात्री आठ वाजतादेखील असाच प्रकार केला. तर ९ ऑक्टोबर रोजी त्याने तिचा पाठलाग करीत तिला रस्त्यात अडविले व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने तिला भर रस्त्यावर मारले. जर माझ्याशी लग्न केले नाही, तर तुला मी जिवंत ठेवणार नाही, अशा प्रकारे धमकी देत त्याने तिचा विनयभंगदेखील केला.