मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईतून विमानाने कोचीला जाण्यासाठी निघालेल्या मल्याळी सिनेमातील एका आघाडीच्या अभिनेत्रीला सहप्रवाशाने त्रास दिल्याची घटना घडली आहे. त्या व्यक्तीने तिच्याशी वाद घातला तसेच तिच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्नही केल्याची घटना तिने विमानातील केबिन कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, तिची जागा बदलून तिला दुसरी सीट देण्यापलीकडे विमान कर्मचाऱ्यांनी या घटनेची फारशी दखल घेतली नसल्याचा दावा तिने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या विमानाने मंगळवारी रात्री ही अभिनेत्री मुंबईतून कोची येथे जाण्यासाठी निघाली होती. तिला मधली सीट मिळाली होती. मात्र, तिच्या बाजूला बसलेल्या एका प्रवाशात व तिच्यात काही वाद झाला. त्यानंतर प्रवाशाने तिच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केल्याचा दावा तिने केला.