धरणगाव लक्ष्मण पाटील : येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुल येथे संविधान दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला तसेच याप्रसंगी २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुड शेपर्ड स्कुल धरणगाव येथे “माझे संविधान, माझा अभिमान” या अभियान अंतर्गत संविधान दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमला माल्यार्पण केले तसेच शाखा व्यवस्थापक जगन गावित यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. तद्नंतर २६/११ च्या भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्या हुतात्म्यांना व प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना आदरांजली अर्पण करण्यात आली. संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. प्रास्ताविकात उपशिक्षक लक्ष्मण पाटील यांनी संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेविषयी माहिती दिली. तसेच संविधान हाच सर्व भारतीयांच्या जगण्याचा आधार असल्याचे देखील प्रतिपादन केले. उपशिक्षक सागर गायकवाड यांनी विविध देशांच्या राज्यघटना व भारतीय राज्यघटना यांची तुलना करतांना सांगितले की, जगातील सर्वात मोठी व लिखित राज्यघटना म्हणून आपल्या भारतीय संविधानाची ओळख आहे. संविधानामुळे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त झाल्याचे मत गायकवाड सरानी मांडले.
कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित व माध्यमिक च्या मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, स्वाती भावे, ग्रीष्मा पाटील, रमिला गावित, पूनम कासार, शिरीन खाटीक, नाजुका भदाणे, दामिनी पगारिया, गायत्री सोनवणे, सपना पाटील, पुष्पलता भदाणे तसेच शिक्षक लक्ष्मण पाटील, सागर गायकवाड, अमोल सोनार यांच्यासह सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल देशमुख हे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. इयत्ता ८ वी ते १० वी च्या विद्यार्थी – विद्यार्थिनींनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन लक्ष्मण पाटील यांनी केले.