पुणे : वृत्तसंस्था
पुणे शहरातील पिंपरी येथील कासारवाडीत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावामध्ये मंगळवारी सकाळी क्लोरीन वायूच्या टाकीतून वायुगळती झाली. त्यामुळे पोहण्यासाठी उतरलेल्या १५ जणांना अचानक खोकला व श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. अनेकजण पाण्यात बुडू लागले; मात्र जीवरक्षकांनी प्रसंगावधान राखून त्यांना बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले. एका दहावर्षीय मुलीची प्रकृती गंभीर असून, तिला खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले.
तलावातील पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन वायूचा वापर केला जातो. त्याची टाकी पूर्णत: गंजल्याने त्यामधून वायुगळती झाली. ही बाब प्रशिक्षक व जीवरक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नागरिकांना तत्काळ तलावाबाहेर येण्यास सांगितले; मात्र श्वास घेण्यास त्रास होत असल्याने अनेकजण पाण्यात बुडू लागले. अग्निशमन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत क्लोरीन वायू पाण्याबाहेर येत हवेमध्ये मिसळला. त्यामुळे समोरील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.