माणसाने माणसाशी माणसा प्रमाणे वागावे हे संविधान शिकवते – न्यायाधीश एस.डी. सावरकर
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: विकल्प ऑर्गनायझेशन व वकील संघ धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त मार्गदर्शन शिबीर शतकोत्तर परंपरा असलेल्या पी. आर. हायस्कूल सोसायटीच्या प्रांगणात अतिशय उत्साहात संपन्न झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, प.रा. विद्यालयात विकल्प ऑर्गनायझेशन व वकील संघ धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमात बोलत असतांना धरणगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश एस.डी. सावरकर यांनी सांगितले की, ‘संविधान आपल्याला कसे वागावे, कसे बोलावे, आपले वर्तन कसे असावे याची माहिती देत माणसाने माणसाशी माणसा प्रमाणे वागावे याची शिकवण आपल्याला देते. व्यक्तीने अधिकारा सोबतच कर्तव्यांची देखील जाणीव ठेवावी, निष्काळजीपणा चुकीला प्रोत्साहन देतो, व्यक्ती बिनधास्त झाला की तोल जातो आणि हा तोल सांभाळण्याचं कसब संविधान आपल्याला शिकवत असते. ठरवलेल्या चाकोरीत जीवन जगलं पाहिजे, कुणालाही त्रास होणार नाही, असे वागणे हिच संविधानाची मोठी शिकवण आहे. संविधान सर्वोच्च आहे. संविधानाचा अभ्यास केला तर जीवनात कोणत्याही गोष्टीची अडचण निर्माण होत नाही. संविधान वाचनातून व्यक्तीवर संस्कार होत असतात’, असे प्रतिपादन न्यायाधीश सावरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी.आर. हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी होते. विचारपीठावर संस्थेचे सचिव डॉ.मिलिंद डहाळे, मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड.बी.के.आवारे, उपाध्यक्ष ॲड. संदीप सुतारे, ॲड.वसंतराव भोलाणे, उपमुख्याध्यापक रामचंद्र सपकाळे, पर्यवेक्षिका डॉ.आशा शिरसाठ, विकल्प ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष प्रा.रविंद्र मराठे, सचिव डॉ.नरेंद्र पाटील, ॲड. गजानन पाटील, ॲड.प्रशांत क्षत्रिय आदी उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन न्यायाधीश एस.डी. सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रा. रविंद्र मराठे यांनी संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाबद्दल तसेच विकल्प संस्थेच्या विधायक कामांचा आढावा मांडला. २६/११ च्या भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्या हुतात्म्यांना व प्राण गमावलेल्या निष्पाप भारतीयांना आदरांजली अर्पण करण्यात आली. विशेष अतिथी न्यायाधीश एस. डी. सावरकर यांचा शाल, पुष्पगुच्छ व भारतीय संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्ष डॉ.अरुण कुलकर्णी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन तसेच इतर अतिथी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुल येथील इयत्ता ५ वी चा विद्यार्थी विवेक लक्ष्मण पाटील याने संविधानाची १ ते ३५ कलमे इंग्रजीत बोलून दाखविली, यावेळी उपस्थितांनी त्याचे कौतुक केले. ॲड. प्रशांत क्षत्रिय यांनी संविधानाची पार्श्वभूमी व विविध भागांबद्दल माहिती दिली. ॲड. गजानन पाटील यांनी कायद्याचा मूलाधार संविधान असल्याची माहिती देत केशवानंद भारती विरुध्द केरळ सरकार या खटल्याचा संदर्भ नमुद केला. डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी शतकोत्तर परंपरा असलेल्या पी. आर. हायस्कूलचा गौरवशाली इतिहास मांडला. विचार मंचावर व समोर बसलेले अनेक मान्यवर शाळेचे माजी विद्यार्थी असल्याची माहिती दिली आणि संविधान दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. डॉ. अरुण कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले तसेच विद्यार्थांनी यशस्वी कसे व्हावे याबाबत मार्गदर्शन केले आणि संविधान दिनाच्या सदिच्छा दिल्यात. संविधान दिनाच्या निमित्ताने पी. आर. हायस्कूल मध्ये आयोजित संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन, पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं बक्षीस वितरण न्यायाधीश एस.डी.सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धांचे आयोजन बी.डी. शिरसाठ यांनी केले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकल्प ऑर्गनायझेशन चे कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी तर आभार प्रदर्शन वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. संदीप सुतारे यांनी केले. कार्यक्रमाला वकील संघाचे पदाधिकारी व वकील मंडळी, महात्मा फुले हायस्कूलचे शिक्षक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, पी.आर हायस्कूल चा परिवार, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करताना न्यायाधीश एस.डी. सावरकर, डॉ. अरुण कुलकर्णी, डॉ मिलिंद डहाळे, ॲड.बी.के. आवारे, डॉ. संजीवकुमार सोनवणे, प्रा. रविंद्र मराठे आदी