नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात चोरीच्या घटनेत वाढ होत असतांना आता चोरटे काय चोरतील याचा काहीही भरवसा नाही. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एका रात्रीत संपूर्ण बस स्टॉप चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बसमधून प्रवास करणारे रोजचे प्रवासी रात्री बस स्टॉपवर उतरले होते, मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यानंतर बस स्टॉपच गायब झाला होता.
संपूर्णपणे स्टीलने बनवलेले हे बस शेल्टर आठवड्याभरापूर्वीच कनिंगघम रोडवर बसवण्यात आले होते, ज्याची किंमत जवळपास 10 लाख रुपये आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बंगळुरू पोलिसांनी या चोरीची नोंद करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. यासोबतच अशा घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. मात्र, आजपर्यंत एकदाही चोर पकडला गेला नाही. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, कनिंगघम रोडवरील संपूर्णपणे स्टीलचा बनलेला बस स्टॉप बंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (BMTC) च्या मालकीचा होता.
चोरीची घटना सुमारे महिनाभरापूर्वी घडली होती, परंतु बीएमटीसी बस शेल्टर उत्पादक कंपनीचे एसोसिएट वाइस प्रेसिडेंट एन. रवी रेड्डी यांनी 30 सप्टेंबर रोजी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे. बंगळुरूमध्ये एका रात्रीत बस स्टॉप गायब होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेकवेळा बस स्टॉप गायब झाले आहेत.
अनेकवेळा हे शासकीय विभागांनी स्वत:हून हटवले आहेत, तर काही वेळा चोरट्यांनी संपूर्ण स्टॉपच चोरून नेला आहे. या वर्षी मार्च महिन्यातही कल्याण नगर येथील सुमारे तीन दशक जुने बस स्टॉप गायब झाला होता. यापूर्वी 2015 मध्येही दूपानाहल्ली परिसरात बस स्टॉप चोरीला गेला होता. तसेच 2014 मध्येही राजराजेश्वरी नगर येथील बीईएमएल लेआउट-3 स्टेजमधील 20 वर्षे जुना बस स्टॉप रातोरात गायब झाला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.