पालघर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना एक धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेत इयत्ता 12 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यींनीची भर दिवसा गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर संशयिताने पळ काढला आहे. या घटनेची माहिती कळताच पाेलीसांनी संशयिताचा शाेध घेण्यासाठी विविध ठिकाणी पथके पाठवली आहेत.
पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार अर्चना वधर (राहाणार पिंपळे हिरवे) असे या घटनेत मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. ती रयत शिक्षण संस्थेच्या गबळपाडा येथील आश्रमशाळेतील होती. आज (शुक्रवार) दुपारी साडे बाराच्या सुमारास ती काॅलेजला जाण्यासाठी निघाली होती.
प्रभाकर वाघेरे याने तिला रस्त्यातच अडवून तिच्यावर धारदार चाकूने वार करून तिची हत्या केली. वाघेरे हा मोखाडा तालुक्यातील तुलेचापाडा येथील राहणारा आहे. त्याने अर्चना हिची हत्या नेमकी का केली याचा तपास मोखाडा पोलीस करत आहेत.