अहमदनगर : वृत्तसंस्था
अहमदनगर एमआयडीसी परिसरातील नवनागापूर येथील चेतना कॉलनीत एका घरात सुरू असलेल्या हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून भांडाफोड केला आहे. या कारवाईत मुंबईहून आणलेल्या दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली असून, सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले यांना बुधवारी (दि. ४) गोपनीय माहिती मिळाली की, चेतना कॉलनी, नवनागापूर येथे राहत्या घरात एक महिला हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालवून तरुणींकडून देहव्यापार करून घेतला जात आहे. ही माहिती मिळताच त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार सानप यांनी एक पथक तयार करून त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचांसमक्ष छापा टाकला. तेथे मुंबईहून आणलेल्या दोन मुली आढळून आल्या. पोलिसांनी त्या मुलींची सुटका करत देहव्यापार करणाऱ्या महिलेला ताब्यात घेऊन तिच्याविरुद्ध भा. दं.वि. कलम ३७० सह अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा कलम ३,४,५,६,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, कॉन्स्टेबल नितीन उगलमुगले, पोलीस नाईक विष्णू भागवत, राजू सुद्रीक, किशोर जाधव, उमेश शेरकर, नवनाथ दहिफळे, सचिन हरदास, मनीषा काळे, सोनाली जाधव यांच्या पथकाने केली आहे..