जळगाव : प्रतिनिधी
चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यामुळे १० चिमुरड्यांची प्रकृती बिघडली आहे. अमळनेर तालुक्यातील गांधली येथे हा दुर्दैवी प्रकार घडला. विषबाधा झालेल्या सर्व चिमुरड्यांवर अमळनेर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्व मुलांची प्रकृती स्थिर आहे.
तालुक्यातील गांधली येथील १० मुलांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यामुळे त्यांना विषबाधा झाली. त्यात ६ मुली व ४ मुलं आहेत. सर्व मुलांना पुढील उपचारासाठी मुलांना ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे दाखल करण्यात आले आहे. सर्व मुलांचे वय हे १० वर्षाखालील आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने आपल्या फेसबुक पेजवरूनही दिली आहे. दरम्यान, एका मुलाला धुळे येथे रवाना करण्यात आले असल्याचेही कळते.
अमळनेर तालुक्यात मुलांनी चंद्रजोत झाडाच्या बिया खाल्याने विषबाधा झाल्याच्या घटनेवर पालकमंत्री गुलाबराव पाटील हे लक्ष ठेवून आहेत, मुलांच्या उपचारात कुठलीही कमतरता न ठेवण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. मुलांची प्रकृती स्थिर असली तरीही सावधानतेचा अतिरिक्त उपाय म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथील बालरोगतज्ज्ञ यांचे पथक अमळनेर उपजिल्हा रुग्णालयात ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी दूरध्वनी द्वारे घटनेची माहिती जिल्हाधिकारी यांचेकडून जाणून घेतली. विषबाधेचे कारण निश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथक संबंधित गावात पाठविण्याचे निर्देश ग्रामविकास मंत्री यांनी दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. अनिल पाटील हे ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या संपर्कात असून मुलांच्या प्रकृती बाबत माहिती घेत आहेत, पुन्हा अशी घटना न घडण्याचे दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत