नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात गेल्या काही महिन्यापासून अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना आंध्रप्रदेशच्या कडप्पामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक पोलीस कर्मचाऱ्याने पत्नी आणि मुलीची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर स्वतःही आयुष्य संपवले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश पोलीस दलातील 1993 च्या बॅचच्या 55 वर्षीय हेड कॉन्स्टेबलने पत्नी आणि दोन मुलींची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून घेत आयुष्य संपवले. कडप्पा येथे घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी (५ ऑक्टोबर) याबाबतची माहिती दिली आहे. ही घटना वैयक्तिक कारणातून घडली असून गुरुवारी सकाळी ही बाब उघडकीस आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या हेड कॉन्स्टेबलच्या घरातून सुसाईड नोटही सापडली आहे.व्यंकटेश्वरलू असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो कडप्पा टू टाऊन पोलिस स्टेशनमध्ये काम करत होता. नेहमीप्रमाणे त्याने बुधवारी रात्री 11 वाजेपर्यंत काम केले आणि पोलिस स्टेशनमधून काही गोळ्या त्याच्या घरी नेल्या होत्या. मृतांपैकी थोरली मुलगीही 20 वर्षांची असून ती पदवीच्या पहिल्या वर्षात होती, तर धाकटी मुलगी 10 व्या वर्गात होती. हेड कॉन्स्टेबलने शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये पैसे गमावले होते आणि काही कौटुंबिक समस्यांचाही सामना करत होता. त्यामुळेच हे धक्कादायक पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.