मुंबई : वृत्तसंस्था
जगभरातील अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत असतांना राज्यातील एका व्हिडीओने सोशल मिडीयावर मोठी खळबळ उडविली आहे. मुंबईतल्या दादर येथील महात्मा गांधी तरण तलाव परिसरातील जलतरण तलावात मंगळवारी ३ ऑक्टोबर मगरीचे पिल्लू आढळून आले. या संपूर्ण प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मगरीच्या पिल्लाला रेस्कू करत ताब्यात घेतलं. दरम्यान, हे पिल्लू नेमके कुठून आले, याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
शेजारीच असलेल्या प्राणीसंग्रहालयातून हे मगरीचं पिल्लू जलतरण तलावात आल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे. या प्राणीसंग्रालयात प्राण्यांच्या तस्करीचे रॅकेट सुरू आहे. हे रॅकेट उध्वस्त केलं पाहिजे, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. प्राणी संग्रहालय अनधिकृत आहे, हे आम्ही आधी पण सांगत होतो आणि आता ते सिद्ध झालं आहे, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. या प्राणीसंग्रहालयाच्या मालकावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील मनसेकडून करण्यात आली आहे.
हा घ्या पुरावा.मगर ही बाजूच्या प्राणी संग्रालयातूनच आली आहे. हे प्राणी संग्रालय नसून हा आहे प्राणी तस्करी चा अड्डा. pic.twitter.com/vZBjlauquJ
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 5, 2023
दादर, शिवाजी पार्क, वीर सावरकर मार्गालगत मुंबई महानगरपालिकेचा महात्मा गांधी ऑलिंपिक जलतरण तलाव आहे. या तलावामध्ये जलतरण करण्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून अनेक नागरिक येतात. नागरिक येण्यापूर्वी या तलावाची कर्मचाऱ्यांकडून पूर्णपणे पाहणी करण्यात येते. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास कर्मचारी तरण तलावाची पाहणी करत असताना या तलावात मगरीचे पिल्लू पोहत असल्याचे दिसून आले. या पिल्लाची माहिती कर्मचाऱ्यांनी अन्य अधिकान्यांना सांगताच, सर्वांची धावपळ उडाली. अखेर तज्ञांच्या मदतीने हे पिल्लू सुरक्षितपणे पकडण्यात आले आहे.