जळगाव : प्रतिनिधी
धरणगाव येथून गोंदिया येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी घेवून जात असलेला ८ लाख ३० हजार रुपये किंमतीचा २९ हजार किलो रेशनचा तांदूळाचा ट्रक मंगळवारी नशिराबाद पोलिसांनी सापळा रचून पकडला. याप्रकरणी नशिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगावातून गोंदीयाकडे रेशनचा तांदूळ ट्रकमधून काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती भुसावळ विभागाचे पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी लागलीच पथक तयार करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक रामकृष्ण मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ पोलिस उपअधीक्षक कार्यालयाचे पोहेकॉ. सूरज पाटील यांनी नशिराबादपासून (एमएच १८, बीझेड १०३९) क्रमांकाच्या ट्रकचा पाठलाग केला. काही अंतरापर्यंत पाठलाग केल्यानंतर त्यांनी तो ट्रक अडविला. त्यावेळी चालकाकडे रेशन मालाच्या वाहतुकीबाबत कुठलीही कागदपत्रे नसल्याने हा ट्रक नशिराबाद पोलिस ठाण्यात आणण्यात आला.
नशिराबाद पोलिस ठाण्यात ट्रकमधील तांदळाची मोजणी केल्यानंतर त्यात २९ हजार ४९० किलो वजनाचा तांदूळ असल्याचे आढळून आले. बाजारभावानुसार त्याची किंमत आठ लाख ३० हजार ६०२ रुपये आहे. या तांदळासह ४५ लाख रुपयांचा ट्रक जप्त करण्यात आला. पुरवठा अधिकाऱ्यांनी पंचनामा केल्यानंतर ट्रक चालक धनराज रामदास सोनवणे (वय ४३), स्वप्नील संजू सोनवणे (वय २०, रा. भुसावळ), नीलेश वाणी ( धरणगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.