सिक्किम : वृत्तसंस्था
देशातील काही राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे सिक्किमध्ये मंगळवारी रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे तीस्ता नदीला महापूर आला असून या महापुरात भारतीय लष्कराचे 23 जवान वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून या जवानांचा शोध घेतला जात आहे. या महापुराचा थरारक व्हिडीओ देखील समोर आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सिक्किममध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी (३ ऑक्टोबर) रात्री या पावसाने अचानक जोर पकडला. परिस्थिती इतकी गंभीर झाली, की अचानक ढगफुटी झाली. त्यामुळे तीस्ता नदीला महापूर आला. या महापुरात फटका लष्कराच्या आस्थापनांना बसला.
लष्कराची अनेक वाहने पाण्यात बुडाली. दरम्यान, या महापुरात भारतीय लष्कराचे 23 जवान बेपत्ता झाले आहेत. प्रशासनाकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. संरक्षण जनसंपर्क अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘उत्तर सिक्कीममधील लोनाक तलावावर अचानक ढग फुटल्याने लाचेन खोऱ्यातील तीस्ता नदीला अचानक पूर आला.
खोऱ्यातील काही लष्करी प्रतिष्ठानांवर परिणाम झाला असून तपशीलांची पुष्टी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्याने डाउनस्ट्रीमच्या पाण्याची पातळी अचानक 15-20 फुटांपर्यंत वाढली. त्यामुळे सिंगतामजवळील बारडांग येथे उभ्या असलेल्या लष्कराचे वाहने वाहून गेले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. सध्या एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. परिसरात इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमी असल्याने बचाव कार्यात लष्कराला आव्हानांचा सामना करावा लागत आहे. कमांड लेव्हलवर असलेल्या अधिकाऱ्यांना ग्राउंड लेव्हलवर लोकांशी संपर्क साधणे कठीण जात आहे.