जळगाव : प्रतिनिधी
उधार दिलेले पैसे परत मागितल्याचा राग आल्याने रुकेश सुनील इंगळे (वय ३०, रा. तरसोद ) या तरुणाला दोन जणांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत एकाने तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी दोघांविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील तरसोद येथे रुकेश इंगळे हे वास्तव्यास असू त्यांनी गावातीलच दोन जणांना पैसे उधार दिलेले होते. १२ सप्टेंबर रोजी ते दोघे रुकेश इंगळे यांना दिसले. त्यावेळी इंगळे यांनी त्यांना उधार दिलेले पैसे परत मागितले. त्याचा त्यांना राग आल्याने दमदाटी करीत शिवीगाळ केली. शिवीगाळ का करतात, असे त्यांना विचारले असता एका जणाने इंगळे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून दुसऱ्याने रॉडने पायावर मारुन दुखापत केली. यात रक्तस्त्राव झाल्याचे पाहून दोघेही पळून गेले. त्या वेळी जखमीच्या वडिलांनी व गावातील काही जणांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध २ ऑक्टोबर रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि संजय जाधव करीत आहेत.