भुसावळ : प्रतिनिधी
सोयाबीन रिफाईंड ऑईलचा टँकर नागपूरकडे निघाल्यानंतर फेकरी टोल नाक्याजवळ १६ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास चारचाकी वाहन चालकाला वाचवण्याच्या प्रयत्न त उलटला होता. या अपघातात त्यावेळी वाहतूक संपूर्ण ऑईल वाहून गेले. तर नागरिकांनी वाहनाच्या टँकरमधील ऑईल लांबवल्याने सुमारे 39 लाखांचे नुकसान झाले होते. याप्रकरणी तब्बल दोन महिन्यानंतर भुसावळ तालुका पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुजरातच्या हजरा येथून नागपूरकडे टँकर (जीजे १२, बीएक्स – ९३२५ ) मधून सोयाबिन रिफाईंड ऑईल घेवून चालक दुर्गाराम गोगाराम जाट ( वय ४७, खडीन, रामनगर, बाडमेर, राजस्थान) हा नागपूरच्या दिशेने निघाला होता. मात्र जुन्या फेकरी टोल नाक्याजवळ चारचाकी वाहन समोर आल्याने चालकाने अपघात टाळण्याच्या प्रयत्न त टँकर कडेला घेतला. मात्र या वेळी टँकर उलटल्याने त्यातून तेलाची गळती सुरू झाली. नागरिकांनी मिळेल त्या साधनांनी तेल लांबवले तर मोठ्या प्रमाणावर सोयाबीन ऑईल वाहून गेले होते. या अपघातप्रकरणी तब्बल दोन महिन्यानंतर चालक जाट यांच्या तक्रारीवरून ३८ लाख ८१ हजार ५८८ रुपयांचे सोयाबीन तेल चोरून नेल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास सहाय्यक निरीक्षक अमोल पवार करत आहे.