बुलढाणा : वृत्तसंस्था
बुलढाण्यासह परिसरात रविवारपासून गजानन महाराजांच्या वेशात आलेल्या व्यक्तीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. बुलढाण्यातील अशोक सातव यांच्या घरी ती व्यक्ती अचानक गजानन महाराजांच्या वेशात येऊन बसला होता. या बाबाला पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. आता हा बाबा नेमका कोण आहे? त्याबाबत माहिती समोर आलीये.
मिळालेल्या माहितीनुसार, या बाबांचे नाव शेषेराव बिराजदार असून बाबाने शासनाच्या निराधार योजनेचा लाभ घेतलाय. या बाबाजवळ ओळखपत्र सापडलं असून तो लातूरचा असल्याचं समजलंय. न्यूज स्टेट या वृत्तवाहिनीने या बाबाची मुलाखत घेतली आहे. मुलाखतीत बाबाने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केलाय. “शेगावातल्या आनंदसागरमध्ये माझी गादी आहे. येथे मी लोकांची सेवा करतो. कुलकर्णी या ब्राम्हणाने मला सांभाळलं.” असं या बाबाने सांगितलं आहे. आनंदसागरमध्ये गादी असून सामान्य माणसांत फिरून मी त्यांना गजानन महाराजांविषयी सांगतोय, असं या बाबाने म्हटलंय. आतापर्यंत अनेक आमदारांनी माझी भेट घेतलीये. माझी सेवा केली आहे, असं म्हणत बाबाने आमदार बबनराव लोणीकर यांचे नाव घेतले. गजानन महाराज माझ्यामध्ये येतात आणि संचारतात, असं हे बाबा वारंवार सांगत आहेत. यावर विश्वास कसा ठेवायचा असं विचारल्यावर मात्र बाबाला समाधानकारक उत्तर देता येत नाहीये. गजानन महाराजांचं रुप घेऊन बसलेला बाबा काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या डीवायडरवर देखील बसला होता. बाबाच्या अशा कृ्त्याने आतापर्यंत लोकांचा त्याने मारही खाल्ला आहे. या बाबाने स्वत: मला महाराष्ट्रातील लोकांनी मारहाण केली असं म्हटलंय.