पुणे : वृत्तसंस्था
सध्या राज्यात अनेक गुन्हेगारी घटना प्रेमप्रकरणामुळे बाहेर येत आहे. त्यात पुणे जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणत अशा घटना वाढत आहे. प्रेयसीसोबत फिरतो म्हणून तरुणाला राग अनावर झाला. त्याने चाकूने सपासप वार करुन मित्राची हत्या केली. इतकंच नाही, तर त्याचे शीर धडावेगळे करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने आरोपी तरुणाला १ लाख रुपये दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
निजाम आसगर हाशमी (वय १९, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा येथे १९ जून २०१८ रोजी उमेश भीमराव इंगळे या तरुणाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला होता. या तरुणाची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना होता. दरम्यान, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत निजाम हाशमी याला अटक केली. सुरुवातीला हाशमी याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलीसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
हाशमी याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. याच तरुणीसोबत उमेश देखील फिरत होता. त्यामुळे उमेश आणि हाशमी यांच्यात वाद झाला. माझ्या प्रेयसीसोबत का फिरतो? तिच्यासोबत लगट का करतो? असं म्हणत हाशमीने उमेशसोबत वाद घातला.
दरम्यान, खून झाला त्या दिवशी हाशमी हा शिरखुर्मा पिण्याच्या बहाण्याने इंगळे याला बाहेर घेऊन गेला. त्यानंतर चाकूने वार करत त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने उमेशचे गुप्तांग कापून पिशवीत टाकले. ती पिशवी स्वारगेट येथील कॅनॉलमध्ये फेकून दिली होती. या पिशवीत सत्तूर आणि इंगळेचा मोबाईल, आधार आणि पॅन कार्डही होते. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी हाशमीला अटक केली. घटनास्थळावरुन महत्वाचे पुरावे देखील जप्त करण्यात आले. गुन्हा सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी २४ साक्षीदार तपासले. यामध्ये परिस्थितीजन्य पुरावा महत्त्वाचा ठरला.