भुसावळ : प्रतिनिधी
भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीत सिमेंट पत्रे बसविताना २० फूट उंचीवरुन पडून एका ठेकेदारीतील मजुराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार घडली. मृत कामगाराचे नाव दिलीप श्रावण रल (37, रा. दुसखेडा, ता. यावल) असे या आहे. या कामगाराला ठेकेदाराने हेल्मेट किंवा अन्य कोणतेही सेफ्टीची साधने उपलब्ध करुन दिली नसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ आयुध निर्माणीतील के.के.इंटरप्राईजेस या कंत्राटदाराकडे दिलीप रल हे गेल्या तीन ते चार वर्षांपासून ठेकेदारी कामगार म्हणून काम करीत होते. शनिवारी आयुध निर्माणीतील एनसीएस या विभागात सिमेंटचे जूने पत्रे काढून नवीन पत्रे बसविण्याचे काम सुरू असताना रल उभे असलेल्या सिमेंटच्या पत्राचे शिट तुटल्याने ते २० फूट उंचीवरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने कामावरील कामगारांनी त्यांना तातडीने आयुध निर्माणी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. रात्री दुसखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत रल यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व एक मुलगी असा परीवार आहे. भुसावळ शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट करीत आहेत.