नाशिक : वृत्तसंस्था
पिंपळनेर येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओझरदे गाव शिवारात एका मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याची घटना मे महिन्यात उघडकीस आली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी डीएनए तपासणीच्या आधारे संशयित निष्पन्न केला आहे. पोलिसांनी संशयिताला अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्री तालुक्यातील ओझरदे गाव शिवारातील एका मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना दि. ३ मे रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात दि. ४ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. मुलगी मतिमंद असल्याने या गुन्ह्याची उकल करणे पोलिसांसमोर आव्हान होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी तांत्रिक पध्दत अवलंबून पीडित मुलगी व परिसरातील तीन संशयित व्यक्तींचे डीएनएसाठी रक्त नमुने घेतले. यामध्ये संशयित शिवा उर्फ शिवाजी डोंगर शिंदे (वय ३५, रा. आंबादर) हा संशयित आरोपी निष्पन्न झाल्याने पोलिसांनी बुधवारी दि.२७ रोजी अटक करून त्यास साक्री न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस तपासात संशयित शिवा उर्फ शिवाजी डोंगर शिंदे याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी दिली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी श्रीकृष्ण पारधी, पोलीस कर्मचारी लक्ष्मण गवळी, कांतीलाल अहिरे, रवींद्र सूर्यवंशी, पंकज वाघ, नरेंद्र परदेशी, दावल सैदाणे यांनी केले.