नागपूर : वृत्तसंस्था
अनेक लोकांना कॉफी प्यायला आवडत असते. कडू-गोड चवीच्या कॉफीचे घोट घेल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं. आजकाल कॉफी तयार करण्यासाठी नवनवी मशीन्सही आली आहेत. कॉफी मेकर मशीनही त्यापैकीच एक आहे. पण या कॉफी मेकर मशीनचा वापर एका व्यक्तीने अशा कामासाठी केला ज्याचा कोणी विचारही करू शकणार नाही. त्याने असं नेमकं काय केलं की पोलिसांनी त्याला थेट तुरूंगातच टाकलं ?
नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका इसमाच्या हालचाली संशयास्पद होत्या. सीमा शुल्क विभागाच्या पथकाने अधिकाऱ्यांनी त्याला थांबवलं. त्याच्या सामानाची तपासणी केली असता, त्यांना त्यामध्ये कॉफी मेकर मशिन सापडलं. आणि त्याच्या आत तब्बल दोन कोटी रुपये किमतीचं सोनं होतं. अखेर त्या इसमाला अटक करण्यात आली.
सीमाशुल्क विभागाने सोने (gold) तस्करीच्या एका धक्कादायक प्रकरणाचा भांडाफोड करत दोन कोटी रुपयांचे सोने जप्त केले. सीमा शुल्क विभागाच्या पथकाने नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद अहमद नावाच्या आरोपीने कॉफी मेकर मशिनमध्ये प्रत्येकी १७४८ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे गोळे ( एकूण वजन 3 किलो 497 ग्राम सोने ) लपवून आणले होते. आरोपी मोहम्मद हा शारजाहून एअर अरेबियाच्या फ्लाइट क्र G9-415 ने पहाटे 4:10 च्या सुमारास नागपूप विमानतळावर उतरला. तो मूळचा उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. विमानतळावर उतरल्यानंतर त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. त्यामुळे कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला थांबवून सामानाची तपासणी केली. त्यामध्ये एक कॉफी मेकर मशिन आढळले. त्याचीही तपासणी करण्यात आली असता, त्यात १७४८ ग्रॅम वजनाचे दोन दंडगोलाकार आकाराचे सोन्याचे गोळे सापडले. त्याची किंमत सुमारे दोन कोटी रुपये इतकी आहे. कस्टमर अधिकाऱ्यांनी आरोपी मोहम्मद अहमद याला ताब्यात घेत अटक केली आहे.
दरम्यान सोनं तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दहा दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने मध्यपूर्व आशियामधून आलेल्या दोन प्रवाशांकडून कॅप्सूल मध्ये पेस्टच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर सोनं आढळून आलं होतं. त्यामुळे नागपूर सोने तस्करीसाठी एक नवा मार्ग बनत चालला आहे का असा संशय निर्माण झाला आहे.