नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील राजकारण गेल्या काही वर्षापासून गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत असल्याचे चित्र नेहमीच दिसून येत असते. अशीच एक धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या आईची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी ही हत्या केल्याचा आरोप आहे. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बनगाव भागात 27 सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे. कानन रॉय (६२) असे मृत महिलेचे नाव आहे.
भाजपचे स्थानिक नेते जयंत रॉय यांच्या त्या आई आहेत. कुटुंबीयांनी हत्येचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी स्थानिक टीएमसी नेते समीर मलिकला अटक केली आहे.समीर मलिक अनेकदा कानन रॉय यांच्या कुटुंबियांशी गैरवर्तन करत असे, असा स्थानिकांचा आरोप आहे. घटनेच्या दिवशी तो कानन आणि त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करत होता. मृत महिलेचा मुलगा आणि भाजप कार्यकर्ता जयंत रॉय यांनी तेव्हा विरोध केला असता समीर आणि त्याच्या गुंडांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून त्याचे वृद्ध आई-वडील आपल्या मुलाला वाचवण्यासाठी पुढे आले. याच मुद्द्यावरून समीरने जयंतच्या आई-वडिलांना मारहाण केली. समीरने जयंतची आई कानन यांच्या डोक्यावर काठीने वार केले, त्यानंतर त्या जमिनीवर कोसळल्या. स्थानिक लोकांनी त्यांना चांदपाडा ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथून त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवलं. मात्र तिथे त्यांन डॉक्टरांनी मृत घोषित केले.