मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. एकीकडे पोलीस आरोपींच्या मुसक्या आवळत असताना, दुसरीकडे अंधेरी परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक ओळखीचा फायदा घेत एका ५३ वर्षीय नराधमाने ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना अंधेरीच्या जोगेश्वरी परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तक्रारदार महिला जोगेश्वरी परिसरात असलेल्या एका सोसायटीत राहतात. तक्रारदार महिला तिसऱ्या मजल्यवर तर आरोपीचे घर तळमजल्यावर आहे. आरोपीच्या कुटुंबासोबत तक्रारदार महिलेची ओळख होती.
तक्रारदार महिलेला नोकरीला असल्याने कामावर जाताना ती आपल्या ८ वर्षीय मुलीला आरोपीच्या घरी सोडत होती. यादरम्यान, आरोपीने चिमुकलीवर वारंवार अत्याचार केला. काही दिवसांपूर्वी चिमुकलीने आरोपीच्या कृत्याची माहिती आपल्या आईला सांगितली. मुलीवर अत्याचार झाल्याचं कळताच आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तातडीने मेघवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारनुसार पोलिसांनी आरोपीविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक देखील केली आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त होत आहे.