भंडारा : वृत्तसंस्था
भंडारा जिल्ह्यातील गोबरवाहीवरून तुमसरकडे कारमधून परत येताना गोबरवाही येथील रेल्वे फाटकाजवळ चारचाकीतून आलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी मॅगनीज व्यावसायिक नईम सिराज शेख (५०) यांच्यावर देशी कट्ट्यातून चार राउंड फायर केले. त्यात शेख यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी भर रस्त्यावर हा थरार घडला. हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून मारेकरी पसार झाले. जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. हल्लेखोरांचा शोध अद्याप लागलेला नाही.
नईम सिराज शेख (५० माकडेनगर, तुमसर ) हे मॅगनीज व्यावसायिक असून रेतीचे कंत्राटदारही आहेत. व्यवसायानिमित्त ते कारने गोबरवाहीला गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचा वाहनचालक होता. रेल्वे फाटकाजवळ मोठा स्पीड ब्रेकर आहे. यामुळे शेख यांच्या वाहनाची गती कमी झाली. दरम्यान, पाठलाग करणाऱ्यांनी डाव साधला. आपल्या चारचाकीतून उतरून त्यांनी नईम शेख यांच्या चारचाकीला घेरले. चालकाच्या बाजूला असलेल्या खिडकीची काच तोडून मारेकरांनी नईम शेख यांच्यावर अगदी जवळून देशी कट्ट्यातून चार राउंड फायर केले. यात ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. फायर केल्यावर पुन्हा मारेकऱ्यांनी त्यांचा जीव गेला आहे काय याची खातरजमा केली. गळा चाकूने कापला, अशीही माहिती पुढे आली आहे. नईम शेख यांच्या कानाजवळ, गळा, मान व छातीवर फायर केल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. ही घटना घडताना नईम शेख यांचा वाहनचालक जिवाच्या भीतीने पळून गेल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी दोन ते तीन संशयितांना ताब्यात घेतले.