मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या सहा महिन्याआधी पोलिसांनी ३ कोटीहून अधिक रोकड जप्त केल्यानंतर पुन्हा एकदा राजस्थान पोलिसांनी गुजरातला निघालेल्या एका कारमधून कोट्यवधीची रोकड जप्त केली आहे. या कारमध्ये २ युवक होते त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. कोट्यवधी रुपये सिरोहीतून अहमदाबादला घेऊन जात होते. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
राजस्थानच्या सिरोही येथील ही घटना आहे. राज्यात काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी शेजारील राज्यातून येणाऱ्या वाहनांवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. पोलिसांनी २४ सप्टेंबरला मावळ येथे वाहनांची तपासणी सुरू होती. त्यावेळी ड्युटीवर तैनात असलेल्या प्रकाश कुमार आणि विजय सिंह यांची नजर सफेद रंगाच्या लग्झरी कारवर पडली.
पोलिसांनी संशय येताच ही कार थांबवण्यात आली. त्यात बसलेल्या युवकांकडून माहिती घेत कारची तपासणी सुरू होती. यावेळी मागील सीटच्या खाली पोलिसांना नोटांचे बंडल दिसले. ही माहिती स्थानिक पोलीस निरिक्षक सुरेश चौधरी यांना देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या अधिकाऱ्यांनी रोकड जप्त केली. ही रोकड इतकी होती की पोलिसांना ती मोजण्यासाठी मशीन आणावी लागली. पोलिसांनी वाहनातून ३ कोटी १५ लाख रुपये रोकड जप्त केली. त्यानंतर तात्काळ रक्कम सीझ करून दोन्ही युवकांना ताब्यात घेतले. आरोपींनी सांगितले की, आम्ही गुजरातच्या पाटन येथे राहणारे आहोत. ही रक्कम सिरोहीहून अहमदाबादला घेऊन चाललोय. परंतु ही रक्कम कुठून आणली याचं उत्तर युवकांना देता आले नाही. त्यामुळे पोलिसांनी नरेश आणि अजित सिंह यांना अटक करून पुढील कार्यवाही सुरू केली. आरोपी हवालाच्या माध्यमातून एवढी रोकड घेऊन जात असून कदाचित एका मोठ्या रॅकेटशी ते जोडले असावे असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. सहा महिन्यापूर्वीही पोलिसांनी याच मार्गावर ३ कोटी रुपये जप्त केले होते.