नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक महामार्गावर अपघात मोठ्या प्रमाणात होत असतांना एक भीषण अपघात केरळ राज्यातून समोर आला आहे. केरळच्या कासरगोड जिल्ह्यात सोमवार २५, सप्टेंबर रात्री स्कूल बस आणि ऑटोरिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच महिलांचा मृत्यू झाला. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील कासारगोड जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी स्कूल बस आणि ऑटोरिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की यामध्ये चार महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.
अपघाताबाबत पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासानुसार बसचा वेग जास्त होता आणि चुकीच्या दिशेने येत असल्याने हा अपघात झाला. बस शाळकरी मुलांना त्यांच्या घरी सोडल्यानंतर परतत होती, त्यामुळे त्यात मुले नव्हती. या अपघातात स्कूल बस आणि ऑटोचे मोठे नुकसान झाले आहे. दुर्देवी म्हणजे अपघातात मृत झालेल्या चार महिला एकाच घरातील होत्या. दरम्यान या प्रकरणी बस चालक पोलिसांच्या ताब्यात असून, लवकरच एफआयआर दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.