जळगाव : प्रतिनिधी
बांधकामाच्या ठिकाणी खेळत असलेल्या सात वर्षाची राधिका दीपक पावरा या चिमुकलीचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास गांधी नगरात घडली. याप्रकरणी पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गांधी नगर भागात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी राहणारे दीपक पावरा हे वॉचमन म्हणून काम करतात. त्यांना चार मुली असून रविवारी त्यांनी मुलींसोबत जेवण केले. त्यानंतर मुली बाहेर खेळण्यासाठी गेल्या होत्या. बांधकामाच्या ठिकाणी खेळत असतांना राधिका ही सापडत नसल्याने त्यांनी तिचा शोध सुरू केला. बराच वेळ होऊनही ती कोठेच न सापडल्याने त्यांनी पाण्याच्या टाकीत पाहिले असता, राधिकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. टाकीतून चिमुकलीला बाहेर काढून त्यांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी बालिकेला मयत घोषित केले. याप्रकरणी पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.