भंडारा : वृत्तसंस्था
राज्यातील भंडारा जिल्हाच्या तुमसर तालुक्यातील सालई शिवारात अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शुभम भोयर याच्या अंत्ययात्रेत सामील झालेल्या नागरिकांवर बाम्हणी स्मशानघाटात मधमाशांनी अचानक हल्ला केला. या घटेन सुमारे २०० नागरिक जखमी झाले.
अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यामुळे अंत्ययात्रेत सामील नागरिकांनी सैरावैरा धूम ठोकली. तिरडी घेऊन जाणाऱ्या नागरिकांनी शेवटी प्रेत खाली ठेवून नदीत उडी मारून मधमाशांपासून आपली सुटका करून घेतली.
शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास शुभम भोयर व मयूर भोयर या चुलत भावंडांची दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला खांबावर जाऊन आदळली. त्यात शुभम भोयर याचा रुग्णालयात नेताना वाटेत मृत्यू झाला होता. त्याची अंत्ययात्रा स्वगावी बाम्हणी येथे रविवारी दुपारच्या सुमारास वैनगंगा नदी काठावरील स्मशान घाटावर गेली.
तेथे अचानक मधमाशांनी नागरिकांवर अचानक हल्ला केला. अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यात नागरिक पळू लागले. मधमाशांच्या हल्ल्यात सुमारे दोनशे नागरिक जखमी झाले. विशेष बाब अशी की तिरडी घेऊन जाणारे पाच ते सहा नागरिकावर मधमाशांनी हल्ला केला. त्यात काय करावे हे त्यांना कळलेच नाही. अखेर जीव वाचविण्याकरीता त्यांनी तिरडी खाली ठेवून थेट वैनगंगा नदी पात्रात उडी मारली. दरम्यान काही युवकांनी हिम्मत करून शुभमचे प्रेत तिरडीसह नेले. त्यानंतर शुभमच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.