नवी दिल्ली : वृत्तसंस्था
चित्रकूटच्या जंगलात प्रयागराज येथून अपहरण केलेल्या व्यापाऱ्याच्या मुलाच्या हत्येनंतर पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन अपहरणकर्ते गोळ्या लागून जखमी झाले. दोघांनाही पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. अपहरणकर्त्यांनी प्रयागराजमधील शंकरगड येथून सदर मुलाचे अपहरण करून १५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न मिळाल्याने त्याची हत्या करून फेकून देण्यात आले.
शंकरगड नगरपंचायतीच्या सदर बाजार येथील रहिवासी पुष्पराज केसरवाणी उर्फ विक्की यांचा १४ वर्षीय मुलगा शुभ केसरवाणी याचे अपहरण आणि हत्येप्रकरणातील सुखदेव (रा. छर्हारा बारगढ, चित्रकूट) आणि संजय वर्मा (रा. शिवपूर पानवारी रेवा) हे पोलिसांच्या गोळ्या लागून जखमी झाले. या चकमकीत शंकरगड पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल सागर देवरिया हेदेखील जखमी झाले आहेत.
पोलिस आयुक्त रमित शर्मा यांनी सांगितले की, पुष्पराजचा ट्रकचालक लोकनाथचा भाऊ सुखदेव आणि संजय यांनी शनिवारी रात्री शुभ याला ससा दाखवण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून नेले. यानंतर त्याच्या वडिलांना फोन करून १५ लाख रुपयांची खंडणी मागितली; परंतु ते पोलिसांत गेल्याने दोघांनी शुभची निर्घृण हत्या केली. अपहरणात सहकार्य करणारा सुखदेवचा मामा गणेश चंद्र यालाही अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून शस्त्रे आणि नंबर नसलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.