नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरातील अनेक पर्यटक नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. जीवनात काही तरी थ्रील हवं, यासाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. काही लोक अॅडव्हेंचर करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात, तर काही लोक थ्रील करण्याच्या नादात खरंच आपला जीव गमावून बसतात.
आता अशीच काहीशी धक्कादायक घटना ऑस्ट्रियातून समोर आली आहे, जिथे एक ब्रिटीश व्यक्ती नाही ते साहस करायला गेला आणि त्या दरम्यान त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. हा व्यक्ती डोंगर पार करण्यासाठी दोन डोगरांदरम्यान बांधण्यात आलेली शिडी चढत होता, ज्याला ‘स्वर्गाची शिडी’ असंही म्हणतात. मात्र एका चुकीमुळे या माणसाचा तोल गेला आणि तो 300 फुटांवरुन थेट खाली कोसळला. इतक्या उंचीवरून खाली पडल्याने त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
युरोपियन देश ऑस्ट्रियामध्ये डॅचस्टीन पर्वत आहे, जिथे लोक आपले फोटो काढण्यासाठी येतात. डोंगराच्या एका भागाला डोनरकोगेल असं म्हणतात. या डोंगराचे दोन भाग आहेत, एक लहान आणि एक मोठा भाग. डोंगराचे हे दोन्ही भाग जोडण्यासाठी 130 फूट जिना बसवण्यात आला आहे, ज्याच्या सहाय्याने लोक डोंगराच्या एका भागावरुन दुसऱ्या भागावर जातात. या दरम्यान खाली 300 फूट खोल दरी असते. हा जिना किंवा शिडी चढणं तसं साहसी आहे, पण छोट्याशा चुकीमुळे जीवही जाऊ शकतो. मात्र लोक फोटो काढण्यासाठी हा भयानक जिना चढण्याचं साहस करतात आणि जिना चढत असताना दुसऱ्या कुणाला त्यांचे फोटो किंवा व्हिडीओ काढायला सांगतात.