पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील प्रत्येक घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे तर अनेकानी घरगुती बाप्पाचे देखील आकर्षक सजावट करून स्थापना करण्यात आली आहे. परंतु गणपतीसाठी केलेल्या आरासच्या लाईटिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याने तरुणाचा झोपेतच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवात लाडक्या बाप्पाच्या आगमनानंतर घरगुती गणपतीला आकर्षक सजावट केली जात आहे. या सजावटीमध्ये विद्युत लाईट, प्लास्टिक फुले, कपड्यांचा वापर अधिक वाढलाय. यावेळी विद्युत लाईनची कुठलीही सुरक्षा लक्षात घेतली जात नाही. यातुनच हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
वैभव गरुड असे मृत तरुणाचे नाव आहे. वैभव गरुड यांच्या रहात्या घरात घरगुती गणपतीला विद्युत रोषणाईसह कापडी आकर्षक सजावट करण्यात आली होती. दरम्यान रात्रीच्या वेळी अचानक विद्युत लाईनमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. यामध्ये वैभव या तरुणाला झोपेतच शॉक लागला. यावेळी लागलेल्या आगीत गणपतीची सजावट जळुन खाक झाली. यामध्ये वैभवचाही दुदैवी मृत्यु झाला. या दुदैवी घटनेमुळे खेड तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली असुन राजगुरुनगर पोलीसांत आकस्मित मृत्यु नोंद करण्यात आली.