जळगाव : प्रतिनिधी
जून्या भांडणाच्या कारणावरुन कुरापत काढून तरुणाला शिवीगाळ करीत त्याला लोखंडी कडे मारुन जखमी केले. तसेच त्याच्या आई-वडिलांनाही धक्काबुक्की करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास नशिराबाद गावात घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील खालची आळी परिसरात कमलाकर प्रभाकर महाजन (वय ३३) हा तरुण वास्तव्यास आहे. शुक्रवारी (दि. २२) मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास कमलाकर महाजन हा गावातील बसस्टँड जवळील दुकानासमोरील पायरीवर बसलेला होता. त्यावेळी गावात राहणारा जयेश रमेश महाजन हा तिथे आला. जुन्या वादातून जयेश महाजन याने कमलाकर महाजन याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याने कमलाकर याने आरडाओरड केली, या आवाजामुळे कमलाकर याची आई आणि वडील घटनास्थळी आले. यावेळी कमलाकर याला संशयिताने हातातील लोखंडी कडे मारून दुखापत केली. तर त्याच्या आई-वडिलांना ढकलून दिले आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर कमलाकर महाजन याने नशिराबाद ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतले. त्यानंतर शुक्रवारी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित जयश रमेश महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नूर खान करीत आहे.