पुणे : वृत्तसंस्था
पुणे जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीला भीती दाखविण्यासाठी पत्नीने अंगावर थोडेसे पेट्रोल ओतून घेत ‘मी मरते आता’ असे म्हणाली. त्यावर पतीने चक्क काडी ओढून पेटवून दिले.
याबाबत अमृता अक्षय कुंजीर (२३, रा. वळती, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी पती अक्षय मारुती कुंजीर आणि सासू आशा कुंजीर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वळती गावात १२ सप्टेंबर रोजी घडला.
फिर्यादी आणि अक्षय कुंजीर यांचा २०२० मध्ये प्रेमविवाह झाला आहे. त्यांना एक मुलगा आहे. अक्षय हा नेहमीप्रमाणे दारू पिऊन आला आणि घरातील सामानाची तोडफोड करीत होता सासू व सासरे शेतात गेले होते. अक्षय पत्नीला तू घरातून निघून जा, असे म्हणाला. त्यावर फिर्यादी ‘मी मरून जाते’ असे म्हणाल्या. तसेच भीती दाखविण्यासाठी शेतीपंपासाठी आणलेले पेट्रोल थोडे अंगावर ओतून घेतले. परंतु त् पतीने काडी ओढून अंगावर टाकली. त्यामुळे त्या पेटल्या. त्यानंतर पतीनेच आग विझविली; परंतु तोपर्यंत फिर्यादी यांची छाती, गळा व तोंडास गंभीर दुखापत झाली होती.
तुला पतीने पेटविले, असे सांगितले तर दवाखान्यात उपचार करणार नाहीत, अशी भीती सासूने दाखविली. त्यामुळे चुलीवर स्वयंपाक करताना भडका होऊन भाजले, असे पोलिसांना सांगितल्याची कबुली फिर्यादीने दिली.