मुंबई : वृत्तसंस्था
देशात गेल्या काही वर्षापूर्वी टिकटॉक सोशल मिडिया मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले होते. त्यावरचे अनेक लोक टिकटॉक स्टार म्हणूनही प्रसिद्ध होतात. असाच एक तरूण देखील टिकटॉक स्टार म्हणून लोकप्रिय झाला खरा पण नको त्या उद्योगात अडकल्यानंतर त्याला तुरूंगाची हवा खावी लागली. मुंबईतून हा धक्कादायक प्रकार समोर आला असून त्या आरोपी तरूणाला पोलिसांनी अटक केली. पण त्याने नेमकं असं काय केलं ?
अभिमन्यू असे आरोपीचे नाव असून तो एक सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम करत होता. अभ्यास करून, प्रामाणिकपणे मेहनत करणारा अभिमन्यू हा त्याच्या आवडीमुळे टिकटॉक स्टारही बनला. त्याचे अनेक व्हिडीओ तो ॲपवर पोस्ट करत असे. मात्र अचानक काय झाले कळलंच नाही आणि हळूहळू तो ऑनलाइन गेममध्ये गुंतला आणि संपूर्ण चक्रच फिरलं. ऑनलाइन गेम खेळण्यासाठी त्याला पैशांची गरज भासू लागली. आणि ते पैसे मिळवण्यासाठी तो गैरमार्गाला लागला. गेम खेळण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी तो चक्क चोरी करू लागला. अशाच एका चोरीनंतर तो विमानाने चक्क रांची येथे जाऊन लपला होता. साकीनाका राहणाऱ्या एका इसमाने यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला. सदर पीडित इसम हे त्यांच्या कामासाठी बाहेर गेले होते. काम संपवून ते घरी परत आले असता, त्यांना त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप आणि कडी तुटलेल्या अवस्थेत आढळली. त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता धक्काच बसला. त्यांच्या घरात घरफोडी झाली होती, सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते आणि रोख रक्कम गायब झाली होती. सदर तक्रारदाराने लगेचच साकीनाका पोलिस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती देत घरफोडी आणि चोरीची तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीमुळे त्यांना अभिमन्यूसंदर्भात समजले व त्याची माहिती काढत ते रांची येथे पोहोचले. तेथे त्यांनी आरोपी अभिमन्यूला अटक केली. पोलिसांनी कसून चौकशी करताच अभिमन्यूने गुन्हा कबूल केला. ऑनलाइन गेम खेळण्याचे व्यसन लागल्याने, पैसे कमावण्यासाठी चोरी केल्याचेही त्याने नमूद केले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई करत आहेत.