नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) उदित पवार यांच्या कार्यालयातील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एसडीएमच्या कार्यालयात एक तक्रारदार कोंबडा झाल्याचे दिसते. घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले.
कोंबडा झालेल्या तक्रारदार व्यक्तीचे नाव पप्पू लोधी असे आहे. त्यांनी सांगितले की, मी एसडीएम पवार यांच्या कार्यालयात मंदिराशेजारील जमिनीसंदर्भात अतिक्रमणाची तक्रार करण्यासाठी गेलो होतो. यावेळी त्यांनी मला कोंबडा बनायला सांगितले. हे प्रकरण जिल्हा दंडाधिकारी शिवकांत द्विवेदी यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल घेत कारवाई केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर एसडीएम पवार यांनी हा आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. तक्रारदार स्वेच्छेने कोंबडा झाल्याचे त्यांनी सांगितले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बरेली प्रशासनावर जोरदार टीका होत असून, प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.